माटीलें बिलगी रडी ऱ्हायंतात
नानाभाऊ माळी
‘आरे गलेंपते चाव्वीवं नको!यंग्रटपना सोडी दे आते!मांगलं मांगे सोडी देवो,मव्हरे चालतं ऱ्हावो!गंजज पाप्पी धोत्रा,टुक्कार बिघाडानं काम करतंस!आघय लायेलं तिरपा दारम्हायीन धीरेस्करी घराम्हा घुस्तंस! त्या घरफोडी निंघी जातंस!दुसरांस्ना भरसे लागू नको आप्पा!कुशीतस्ना भरसे लागी घर फोडी नींघू नको!तिरपा दारे करू नको!भितडां फोडी नवा दारे बसाडू नको!’आण्णा मोठा आंडोंरलें हात जोडी रावनायी करी ऱ्हायंता!समजाडी सांगी ऱ्हायंता!
आप्पा मोठा आंडोंर व्हता!पाच भाऊस्मझार जेठा मोठा व्हता!समजदार व्हता!बठ्ठ नेम्मन चाली ऱ्हायंतं!पन आप्पान्हा डोकाम्हा कोनीतरी मोठ्ठ मतलबन्ह किडूक घाली देयेलं व्हतं!कोंता पाप्पी धोत्रानीं आप्पान्हा कानम्हा जहर वतं व्हतं व्हयी देव जाने!न्यारा नींघानचं धुटूकनं लायी बठेल व्हता!गावम्हा आण्णान्ह मोठं नवाजेल खटलं व्हतं!बठ्ठा एकजूक व्हतात!पाच आंडोंर, व्हवां,बठ्ठा धल्ला धल्लीनां ताबाम्हा व्हतात!आयकून व्हतात!पाच पांडवस्नागत व्हतात!आण्णान्हा घरगंम कोनी वाकडी नजर करी दखानी ताकद नही व्हती!पन घर फोडागुंता घुसीस्ना नेम्मन वापर व्हयेलं व्हता!एक एक घूस घरम्हानी माटी उकरी उकरी पुरं घर पोक्कय करी ठेयेलं व्हतं!घर धसानीं वाट दखी ऱ्हायंतात!गंजज घुसी परक्या व्हत्यात!बाकीन्या रस्ता दावनाऱ्या घुसी घरम्हान्याचं व्हत्यात!माटी उकरी उकरी घर धसानी वाट दखी ऱ्हायंतात!

आण्णा नाकन्हा समोर चालनारा सरयमार्गी धल्ला व्हता!पाची आंडोंरस्लें नेम्मन वयन लह्यन लायेलं व्हतं!घर जसी काय भरीम लोखंडी भितडास्न बांधेल व्हतं! गावमां ती दंडार आसामी व्हती!सत्तर पर्तनन्ही बांधेबांध एकठोक जमीन व्हती!राबी राबी कमायी काढी ऱ्हायंतातं!दरोज यांय उगाफाइन माव्या पावूत निस्ता कामेस्ना गोमंडां ऱ्हायें!धल्ला-धल्ली, पाची भाऊ, व्हवा आखो सालदार आल्लगच व्हतात!आण्णान्ही बठ्ठास्लें दरोजन्हा कामे नेमी देयेलं व्हतात!दिन कता उगे,नीं कता माव्य्ये,ध्यान नही ऱ्हाये…. आनीं घुसीस्नी कोरी कोरी पोक्कयं करेल भितडां एकदिन धसी उंथात!
गंजज दिन किरकिरी आयकीस्नी,सहीन करीस्नी एक दिन आण्णा हात टेकीस्नी उठना व्हता!भरेलं घरनां सऱ्या वाकी जायेल व्हता!धल्लानीं पाची आंडोंर-व्हवास्लें जोडे बलायीस्नी सांगी टाक व्हतं,’दखा पोरेस्वन!पोरीस्वन!आपला घरनं नाव तुम्हना न्यामीन कर्तूकमुये बठ्ठा गावंम्हा नवाजनं व्हतं!तुम्ही पाची लाल पाच पांडव व्हतात!एक मूठम्हा व्हतात!पन जाउद्या पोरेस्वन आते!कोठेतरी,कव्हयतरी थांबनंचं पडतं!आप्पानीं इच्छा से न्यारा नींघांनी!तुम्ही बठ्ठा समजदार व्हयी जायेलं सेतस आते!तुमल्हे पखे फुटी ग्यात!सोतानां पखेस्वरी उडालें लाग्नात!मन मोक्या उडालें आते आभाय मोके से तुम्हले!मी आन तुम्न्ही माय भी धल्ला व्हयी गवूतं!हाऊ पसारा तुम्हलेचं दखना पडी!घरन्हा सऱ्यालें उधी लागी जायेल से!रद्दान्ह्या भीतडांस्लें घुस लागी जायेल से!घर धीरे धीरे धसी ऱ्हायनं!’
मझारम्हाचं धल्ली माय बोलनी व्हती,’पोरीस्वन तुमल्हे पाचीस्लें आल्लग भानसीन,चुल्हा पाहिजे व्हता!नवां चुल्हा,नवा तावावर शेखेल भाकरी तुम्ही आवडी आवडी खात ऱ्हावा!सुखना ऱ्हावां!’ आसं बोलीस्नी चालनी गयी!भरेल डोयास्न डाबरं मांगलंदारे उपसी ऱ्हायंती!बठ्ठा गुच्चूप बठेल व्हतात!बठ्ठास्नी आग्रोह करावर धल्ला -धल्लीनां मरदभाग आल्लग काढीस्नी मंग घरे वावरे वाटी लिंथात!
त्या रातलें घरमान्हा धाकल्ला पोरे सोडी ते बठ्ठास्ना डोयालें डोया लाग्ना नही व्हता!ती सांधेलं घरनीं शेवटली रात व्हती!दिन उगताच बठ्ठा पक्षी आपापला घरे उडी जाणार व्हतात!कोनी खुशीम्हा जपेलं व्हतं!कोन्ह कायेज तुटतूट करी ऱ्हायंत!ती कायी कुट्ट रात व्हती!आंधाराम्हा उजाये झामली ऱ्हायंती!कोनल्हे सतान्ह वावर दिखी ऱ्हायंत!कोनलें सतान्हा चुल्हा दिखी ऱ्हायंता!घरलें सुरुंग लागेलं व्हता!चांगला संस्कारवर हुभा घरलें भी घूस लागेलं व्हती!धल्ला-धल्ली रातभर तयमय तयमय करी उजाये चाफली ऱ्हायंतात!सत्तर परतनन्हा मालक आंधारं उखली ऱ्हायंता!पिढीजात उभा घरना खांब भितडाम्हा बुंजायी ऱ्हायंता!
दुसरा दिनफाइन बठ्ठा पाची भाऊ घर,वावरेस्ना वाटा पाडी आल्लग व्हयी गयतात!जो तो ज्यानंत्यानां, आपापला काम धंदाले लागी गयतातं!आण्णालें कामच ऱ्हायन नयी व्हतं!धल्ला-धल्ली आल्लग व्हतात!एक दिन असाचं धल्ला काठी टेकत टेकत बजारनां गंम जायी ऱ्हायंता!जाता येता लें राम राम, शाम शाम करी ऱ्हायंता!चालता चालता धल्लानी ध्यान चौकनां कोपराम्हा उभा आप्पा,तीन नंबरनां आंडोंरं रमेश,त्यानंसासरा आशा तीन चारजन हासी-खुशी दात्थड्या काडी, गप्पा मारी ऱ्हायंतात!त्यास्लें दखी आण्णान्हा जीव बयी गयता!जीव गुदमराले लाग्ना व्हता!एक घरना पाच घरे करणारा याहीचं व्हता आशी खातर जमा व्हयी गयती!धल्ला तठेचं उभा ऱ्हायी थरथर करी,धडकरी जमीनवर जायी पडा!धल्ला कता व्हयी गयता!काठी कती व्हयी गयती!तठे गर्दी गोया व्हयी गयती!त्या गर्दीम्हा आप्पा, रमेश खाली वाकी दखालें लाग्नातं ते आण्णालें दखताच त्यास्ना हुंडूक दाबायी गयता!धल्लानां जीव सर्गे चालना जायेल व्हता!भर चौकम्हा धल्लानीं जीव सोडी देयेलं व्हता!पोरे धल्लालें बिलगी बिलगी रडी ऱ्हायंतात!त्या माटील्हे धरी आसूं गायी ऱ्हायंतात!
नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१२ मार्च २०२५