येड बोयनी झावर

येड बोयनी झावर

” येड बोयनी झावर ”

” येड बोय शे का घरमा ? येड बो ss य … वं ss येड बोय … ! आयाय माय … कथ्थ्या गयात व्हतीन या वं माय ? ” …. शांता माय भाहिरथीनच हाका मारी राह्यंथी . येड बोयले मज ऐकाले ये . माज मांगना दारे व्हती ती . कसं ऐकाले ई बरं ? आनी सद्या कानी येड बोयले पन कमी ऐकाले येत व्हतं . तवसामा शांता माय हाका मारत मारत घरमा गयी . येड बोयले कोनी तरी हाका मारी राह्यंत असा सासुल लागना .

” कोन शे वं पोरी ? ”

” मी शे वं आत्या बाई … ”

” तु शे ‘ पन कोन शे . .

ते तं सांगशी वं माय ” ..

तवसामा शांता बोलनी ” मी शे आत्या बाई शांता ”

येड बोयले अंधारामा काय दखाये नई .

डोया मव्हरे हात धरा तवय कोन शे असा दखाले लागनी ” शांता ? आनी तु कोनी शांता शे वं माय ? ”

कारन तठे दोन तीन शांता नावन्या पोरी व्हत्यात म्हनीसन येड बोयनी इचारं . . . तवसामा शांता बोलनी ” मी शे आत्याबाई आधार बापुनी शांता … उच्च वटानं घर नई का आम्हनं ..? ” मंग ध्यानमा उनं येड बोयनं .. ” वं माय तु शे कां आधार बापुजीसनी शांता का ? काय काम काढ वं माय राम पाह्यरामा ? ”

” आत्या बाई . तुमीन झावरी भलत्या मस्त शिवतीस म्हने ‘ म्हंत मन्या दोनी पोरीसले दोन झावरी वाट लावान्या शेत . थंडी दखाना कशी पडी राह्यनी माय ! ” ….. तवसामा येड बोय थर थरता आवाज मा बोलनी … ” वं शांता दख बईन आते माले कानी कमी ऐकाले येस वं बईन काय करस माय ? दख या वट्टा ना कोर वर बस आनी निचेतवार सांग माय . “

येड बोय त्या गावमा झावरी शिवाना काममा एक नंबर व्हती . परख्यात व्हई गयथी . येड बोय झावरी शिवतांना ज्या टाका मारेत त्या झावरी धा बारा वरीस काढी देत . बोय पान दोरा भलता मजबुत व्हता . झावरीसना दोरा इतला पक्का राहे का ईचारू नका . आनी मोठ मोठाल्ल्या सुया राहेत . टाका मारानी इनानी पद्धत जी येड बोयपा व्हती मी म्हनस त्या आसपासमा कोन्ताच गावमा सापडाव नई . झावरी शिवनाऱ्या बाया गावो गाव राहतीस . राहतीस नई अशी नई .

पन येडबोय नी ती झावर ऱ्हास म्हंजे त्यामा देवना वावर ऱ्हास अस्सच समजा . त्या झावरमा मारेल टाका उकलतच नई व्हता . मऊशार झावरी ‘ उबदार झावरी येड बोयन्या हातन्या राहेत . त्यासले उब व्हती . येड बाई त्या शिवतांना त्यामा जशी काय जीवच ओते अस्सच म्हना तुमीन . मन लाई काम करे . आनी एक एक टाका तिरपा नई का तारपा नई ऊस नी मेर लावाना वखत बांड्या ऊस एक लाईनमा खोचत जातस तस्सच तिनं काम राहे . धा बारा वरीस त्या गोधडी ले दखानं काम नई राहे .

दूर दूरना लोके गाडा जुपीसन येड बोय कडे झावरी शिवाले येत . अशी किरती येड बोयनी त्या आजु बाजूना गावेसमा परिसरमा व्हती .

येड बोयनं वय बरंच व्हई जायेल व्हतं . येड बोयले कोनाच आधार नई व्हता . वडिलोपार्जित लांब लचक मव्हरनं दार ते मांगनं दार लोंग घर व्हतं . पाच येलीसनं घर व्हतं ते . पन काय व्हतं तिले कोनाच आधार नई व्हता हाई भलती मातर पंचाईत व्हती गड्यासहोन . एकुलता एक पोरगा नयतरना ‘ देवले प्यारा व्हई गयथा . म्हनीसन ती दुखी सुखी व्हती . पन मंग कोठे तरी जीव गुताडाले जोयजे म्हनीसन या झावरी शिवामा ती सोयताले अडकाई ठे . धल्ली दखाले गोरी पान व्हती . थोडी शी वाकी गयथी . पन तयोदा भागन्या काठ पदर न्या उलटा पदर ना पातये नेसेत तस्साच भडकदार उठावदार पातये येड बोयले शोभीसन दिसेत . ऐकाले कमी ये म्हनीसन तोंड जोडे लिसन येड बोयले बोलानी सवय व्हती .

पन तिना या पड़ता काय मा हाई तिनी कलाकारी कामे ई राह्यंती … पन तिना या झावरीसनी चर्चा गावो गाव पसरी गयथी . येड बोयनी झावर म्हंजी ‘ मया नी झावर त्यामा प्रेम भरेल ऱ्हास . माया ऱ्हास . झावरमा पुरन टाकानी पद्धत व्हती ती न्यारीच व्हती . एक एक पदर मोक्या मोक्या करी त्यामा पुरन भरे . त्यामाच तर खरी कला व्हती . मंग ती झावर आंगले कध्धीच चर चर लागाव नई .

पांघरावर मऊ लागे . उबदार लागे . कश्शीका थंडी ये ना ती झावर पांघरताच थंडी कथी नबेदा व्हई जाये पत्ताच नई लागे तिना . झावरी शिवनाऱ्या तशा मुकल्या शेत पन त्यामा पुरन भरानं कसब पदर रचानी पद्धत जे येड बोय पा व्हती ती कोनापाच नई व्हती . ती एक परकारे कला च व्हती असं च म्हना तुमीन . तो दोरा ओवाना टाका माराना जो त्या कामना आलोखा सलोखा व्हता तो फकस्त येड बोयपाच नेमका व्हता .

म्हनीसन येड बोय नी झावर ना वावर गावोगाव व्हई गयथा . येड बोयनी झावरनी किर्ती गावोगाव पसरी गयथी . दूर दूरना लोके गाडा जुपी जुपी सन येत आनी झावरी तयार करीसन लई जायेत. त्या झावरमा जीव ओते येड बोय जीव ओते . ओवानी पद्धतच न्यारी व्हती . गरम शॉल ? झक मारे हो येडबोयना झावरना मव्हरे . एक सांगस पटाव नई पन त्या गावन्या ज्या पन लेकी ‘ सुना बेट्या सासरी ग्या व्हतीन त्या येडबाईनी झावर लई जावा शिवाय राहेल नईत बरं ! आपल्या माहेरन्या झावरनी किरती आपला सासरले सांगा मुचुक राहेत नईत हाई गोट तव्हढीच खरी बरं !

काश्मिरी शॉल ‘ गरम शॉल रग काय करतस हो ? तुमले पटाव नई पन हाई आमना येड बोय नी शिवेल झावरनी कमाल शे . बये कशी का थंडी कुमचाडे ना येड बाईना झावरमा एकदाना का मानुस घुसनाका बये थंडी पयालेच जोयजे .. गावो गाव या येड बाईना झावरनी किरती जाई पसरनी व्हती .

नवरदेव नवरी लगीन करीसन जायेत तवय आमना गावनी हाई झावर लई जावा बिगर राहेत नईत . एक दा गम्मत झायी . आम्हना गावना सरपंच नी तालुका पंचायतना परमुख ले हाई झावर दखाडी .त्या एव्हढा खुष झायात . तालुका पंचायतना दोन तीन परमुख आमना गाव जीप गाडी लयंथात . येड बोयना घर ग्यात . आनी तालुका आनी जिल्हामा हातमाग ना परदशनमा येडबोयनी झावर ठी व्हती . त्या परदरशनमा येड बोयनी झावर ले पहिला क्रमांक भेटना . सरकार दरबारमा येड बोयना सत्कार झाया . हातमाग ना अधिकारी येडबोयना घर उथांत . गावन नाव आख्खा जिल्हामा पसरी गये . येड बोयनी किर्ती वारा सारखी आख्खा जिल्हामा पसरनी . गावनं नाव झाये . अशी आमना येड बोयना झावर नी करामत व्हती .

तर मंडई थंडीना दिन शेत आनी या थंडीमा तुमीन पन आमना गावनी या येड बोयनी झावर पांघराना आनन जरूर ल्या . हात उद्योग ‘ कुटीर उद्योग ले चालना देवालेच जोयजे हाई मनी हात जोडी इनंती राही . हात न्या काम्ब्या ‘ घोंगड्या ‘ झोऱ्या ‘ आनी या आपल्या उबदार झावरी आनी हातना कोनताबी उद्योग हो त्याले गती आनी चालना देनं आपलं काम शे आनी सरकारनं पन त्याले चालना देनं हाई काम शे .

तर मंडई हाई व्हती आमना येड बोयनी झावर नी ऊब .. माया .. जिव्हाया ..! आते मी पन येड बोय नी झावर पांघरस बरं ! आनी बसस वट्टाना कोरवर …! तवलोंग …

राम राम मंडई ‘ रामराम ..!

विश्राम बिरारी ‘ धुळे … 9552074343 ………