खान्देशी अहिराणी विनोदी प्रसंग माले तठेच बसनं शे

माले तठेच बसनं शे

दिड दोन महिन्यापूर्वी मी माझ्या एका मित्राला गावी सोडण्यासाठी धुळे बसस्टॅन्ड वर गेलो होतो , त्या मित्राला जाण्याची फार घाई होती ,म्हणून आम्ही दोघे बस येण्याची वाट पाहत उभे होतो , योगायोगाने थोड्याच वेळात बस आली आणि माझा मित्र बस मधे जाऊन बसला… बस मधे काही विशेष गर्दी नव्हती पण ड्रायव्हरच्या सीटच्या मागे दोन बायका बसल्या  आणि थोड्याच एक बाई परत बस मधे चढली आणि ती त्या दोन बायकांन जवळ जाऊन बसली.

                    थोड्या वेळात एक मध्यमवयीन खेडूत माणूस बसमधे चढला , तसा तो सडपातळच होता , पांढरा शर्ट  , पांढरा ढगाळ पायजमा डोक्यावर घामाने तांबूस झालेली टोपी आणि खोल गेलेले डोळे असा त्याचे व्यक्तिमत्त्व होते… तो इसम त्या पुढच्या सीटवर बसलेल्या तिसऱ्या बाईकडे रागाने पहायला लागला  आणी म्हणाला ” ओ ताई हाई मन्ही जागा शे ना , तुम्हीन कश्या काय बशी गयात तठे  ”  ती तिसरी बसलेली बाई थोडी सुशिक्षित होती तिने नम्रपणे विचारले


” काय झाले , आहो या दोघी बायका आणि मी पण बाई म्हणून बसली यात काय झाले ऐवढे “

” नै ताई ती मन्ही जागा शे , मी जागा संभाळेल शे ती “
” आहो दादा मागे भरपूर जागा आहे तिथे बसून घ्या ना तुम्ही… माझ्याकडे सामान जास्त आहे म्हणून मी इथे बसली आहे “

” नै ना ताई , ती जागा मन्ही शे ना ,माले तठेच बसनं शे , तुम्ही शिकेल सवरेल लोकस्ले समजत नै का , ती मन्ही जागा शे ” असे तो तावातावाने बोलु लागला , त्याचे ते जोरजोरात बोलणे ऐकुन लेडीज कंडक्टर त्याला म्हणाली
” काय रे तुन्हं इतलं काय आडी जायेल शे तठे बसानं,  बाई ना जोडे बाईच बसनी ना . उगामुगा मांगे बसनं व्हई ते बस नै ते खाल्ता उतर  “

” ताई ती बाई मन्हा जागावर बसनी ना , तुम्हीनं त्यास्लेच सांगा मांगे बसाले, मी तठेच बस्सु  ” त्याने त्या लेडीज कंडक्टरला जोरात बोलुन उत्तर दिले . त्याचे ते बोलणे ऐकुन बस ड्रायव्हर पण त्याला बोलायला लागला आणि वादाला सुरुवात झाली .


                वाद झाल्याचे पाहून पुढे ज्या दोन बायका आगोदर बसल्या होत्या त्यातली एक बाई बोलली
” दादा या मन्हा घरवाला शेतस  , त्यास्ले मन्हा जोडी बशीस्नी परवास करानी हाऊस शे , त्या कोणज ऐकाऊ नै , त्यास्ले आठेच बसु द्या ”
त्या बाईचे उत्तर ऐकून सर्व प्रवासी हसायला लागले ,आणि लेडीज कंडक्टर म्हणाली ” वा रे मन्हा लाल बायको वर इतलं पेरेम करणारा मानुस पहिलीसावच देखा मी , काय व ताई ह्या घरपन असच पेरेम करतस का तुम्हनावर  “

” ताई कसानं काय , कसानं पेरेम बिरेम  , त्या एकला बसाले घाबरतसं मन्हीस्नी इतला कल्ला करी राहिनात त्या ” त्याच्या बायकोने उत्तर दिले आणि परत सर्व हसायला लागले , बस ड्रायव्हर त्या बाईला बोलला ” मंग वहिनी घरथुनच त्यास्ना कान फुकी लई योवोना  “
परत सर्व हसायला लागले , ती तिसरी बसलेली बाई हा सर्व संवाद ऐकून उठली आणि मागे जाऊन बसली आणि तो माणूस त्याच्या बायको जवळ जाऊन बसला , मात्र त्याने आपले तोंड टोपीने झाकुन घेतले होते.

         आपलाच
नितीन अहिरराव ( धुळे
) खान्देशी अहिराणी