काय येयेल व्हता मातर
ते चौसट पासटन साल व्हत. तदय मी पंधरा वरीसना व्हसू. तो दोनचार वरीसना काय मन्हा जिंदगीम्हाना भलताज खडतर व्हता, त्या दिन मी कसा लोटात ते आते मालेबी कयत नही.पोर सोसज का ढोर सोसज तेज खर. लिखाभुसाना नाचाकुदाना वयम्हा माले काय भोगन पडनं यान्ही आते नुसती याद उनी तरी आंगवर काटा उभा -हातस. मातर खराब वखतम्हा जगानी ताकद मानुसले देवज देस हायी मातर खरं से. मन्हा मोठा भाऊ बाप्या तदय धुयाले आघाव ट्रेनींग कालेजले व्हता.माले म्हतारानी साया सोडी घर ठी ल्हेयेल व्हत.सातेक इघा जमीन व्हती.कमाई जेमतेमज व्हये तसाम्हा लगोसगना दुस्काय. त्यामये घरम्हा खावानी बी मारामार व्हती. दोन वरीस पह्यलेंग माय देवघर चालनी जायेल व्हती. माय मरामये घरले जोडनार सांधा राह्यना नव्हता.काका वाला कुदी गयात. म्हतारानी दुसर लगीन कय नही त्यामुये घरम्हा बाईमानूस नव्हतं.घरम्हा झाडझुड, रांधापंदा पासीन भांडाकुंडा धवालोंग समध मालेज करनं पडे
त्या सालले दोन बिघा कामोड्या लायेल व्हता. हेरवरं आईल इंजीन बसाडेल व्हत.भरना झाया म्हंजे दूसरा आडा कामे -हायेतज. संध्याकायले फिरीसन भरना.रातले घर येतायेता वडांगीस्ना काटापेटा झोडी बयतनं करी लयनं पडे.घर येताज दिवाबत्ती करी दोनतीन मेंगरा ठोकू. तेलफूल -हायनं तं भाजी करु नै तं कोल्ला तिखासंगे भाकरतुकडा गियना पडे.खातपेत दहा वाजी जायेत. मन्हा लंगठी यार तवढाम्हा माले हाका माराले लागी जायेत.मैतरमंडयीम्हा हासाबोलाम्हा सिनभागडा निंघी जाये.आमी बोरी नदीना वावूम्हा दोनदोन घटका गप्पा करत बसूत. कधीमधी मी मन्ह हायी दुखड सांगाले लागी जाऊ. आमना नाग्या बापू भलता इनोदी व्हता.तो सांगे, ” रम्या दुखले कवटायत बसो नही रे ! आरे येरमेरले चिडायीचाडायी ल्हेवो,हासीबोली ल्हेवो, दूख आपुनले भ्यायीसनी पयी जास.” नागा बापूनी नादारी व्हती तो सायाबी शिके दुस्कायी कामवरं कामवे बी जाये. टिक्कमवरी खड्डा खंदामुये त्यान्हा हातले फोड येयेल -हायेत.तो माले सांगे, ” दख रे रमा या मन्हा सोबती. ह्या फोड फुटनात म्हंजे मी जीभवरी चाटी ल्हेस.मंग हायेद भरी ल्हेस. आते दख कसा हातले घट्टा पडी गयात ” तवसींग दूसरा जोडुदार पक्या म्हने, ” ये भागुबाईना मायक रडत काय बसस.आरे गमम्हाबी मजा -हास.अपदा उनी म्हंजे तिन्हासंगे दोनदोन हात कराले माले तं भलती मजा वाटस भो.मुसीबतले आपुन सांगो व्हयी जाऊ दे कुस्ती” मन्हा लंगटी यार सदु हायी आयकीसन म्हने,” रमा ह्या भी दिन चालना जाथीन ! दिन कोन्हा बसी -हातस का? दखा गड्याहो मी एक हत्ती सिगारेट लयेल से, आईपाईखाल चारीमिसन फुकी टाकूत.वाव! काय मजा यी -हायनी. पेता पेता नाग्या म्हने,” दुनियामे हम आये है तो जीनाही पडेगा ” दुख हलक व्हयी जाये.मंग घर जायी गोधडीम्हा पडताज डोया लागू जायेत.
दिन उगना म्हंजे रहाटगाडग सुरु.सेनपुंजा,पानीकांजी, रांधनपंदनं उरकी वावरम्हा जावानं. यकदिन सदुकडे मी वाडाम्हा पायेस्ले आढी घाली खीटलावर पडेल व्हतू. तदय त्यान्हाकडे एक टियावाला मायकरी पाव्हना उना. मी उठी बसनु.मायकरी बाबानी माले नावंगावं इचार. काय कामधाम करस? साया शिकस का? आसी चवकसी कयी. बाबा मन्हाकडे टक लायी दखता दखता सांगाले लागना, “ये पोरा तू भागवान से, तुन्हावरं दत्तनी छाया से. तुन्हावर कसाबी वखत उना तरी घाबरु नको.दत्त तुले त्याम्हायी तारी ल्हयी जायी.मातर तू पायले आसी आढी मारी जपत नको जाऊ. करता इथीन तं गुरुवार करत जाय. तुन्हा काय येयेल से मातर येय येयेल नै. दख थोडाज दिनम्हा यान्ही परचोती तुले यी.
दोनेक दिन ती गोटले व्हयेल
व्हतात. मी कामोड्यान भरनं करा गुनता भाकर गुंडायी मयाम्हा गऊ. हेरवरं आड आईल इंजीन बसाडेल व्हत. ते भारी जड व्हतं.ते चालू करा गुनता हेन्डल माराले लागनू, इंजीन तं चालू व्हयी गय मातर मन्हा आंगम्हानी कुरची चाकम्हा आटकी गयी.कुरची मियता मी भी चाकसंगे फिराले लागनू मातर माले यरायक कसी काय बुध्दी झायी कोन जाने ! मी फिरता फिरता दोन्ही पाय फाऊंडेसनले टेकी जोर लाया. सदरा जाडा पन जुना व्हता तो धटकन तुटना नी मी धपकन बाजूले आपटायी गऊ. वाचनू खरा मातर झाम यी पडी गऊ. मन्ही सुधबुद कराले तठे कोन्हीज नै व्हत. थोडा टेमम्हा माले सुध उनी तसाज उठनु पानी पीसन लांघीधरी बारा धराले गऊ. दुपारलोंग भरना चालना , हेर आटायनी तदय मशीन बन करी भाकर खायी थोडासा आडा पडनू. मंग इसूक,कुदायी,पावडी ल्हीसन केयनी पाचट आवराले गऊ. पह्यलेंग कुदायी पावडी घायी मोकी जागाम्हानी कुजेल पाचट खंदीखुंदी बाजूले कयी. पाचटनं खत बनी जायेल व्हत. मंग बोरीस्ना बोरकाटा इसुकवरी उचली दूर फेकी -हायंतू. पाचट काढेल जागावरं मोठामोठा बधा/नया व्हतात. मी त्या नयाजवरं उभा -हायी बोरफाटा इसुकवरी वर उचलात. तवढाम्हा माले फुसफुस आवाज ऐकाले उना. मी खाले दखाले लागनू , खाले दखताज मन्ही जसी काही दातखियी बसी गयी. पुतयाना मायक जागेज उभा राही गऊ. मन्हा पायखालना नयाम्हाईन भलमोठ जनावर मन्हा पायना खल्लीथाईन बाहेर पडी -हायंत, नी माले काही सुचे नै. मी गच डोया लायी सास रोखी उभा -हायनू. डोया उघाडी दखतं जनावर सवसात फुट लांम्ह लालबुन नी चपय व्हत. ते तदयज सरसर मव्हरे कोराम्हा निंघी गय. ते जाताज मी इसूक फेकी हेरवर पयनू. मी गांगरी जायेल व्हतू काहीज सुचे नै. तठे हेरजोडो मन्ही भावकीना चुलतभाऊ भिला आप्पा बक-या चारी -हायंता. त्यानी माले भेदरेल दखी इचारं, “कारे रमा काय झाय रे भाऊ ? ” मन्ही तं बोबडी वयी -हायंती. मी कसीबसी समधी घडेल गोट सांगी. भिला आप्पानी काकाना मयाम्हाईन नियी मिरची तोडी आनी.माले खावाले लायात. लिंबना पाली खावाले लायात. मंग इचारे, ” मिर्ची तिखट लागस ना? निंबना पाला कडू लागस ना ? ” मी हा सांग, मंग भिलाआप्पानी मन्हा तयपाय बोटे तपासात मंग म्हने, ” रमा नाग देवताले हातजोडी मनेमन नमस्कार करी ल्हे, वाची गया तू ! मधुर मायनी पुन्यायी कामले उनी भो “
याय बुडावर घर उनू. हुंडूक दाबी तसाज कामले लागनू. चुल्हा चेटाडी मेंगरा ठेक्यात निया मिरच्या भुंजी ठेसा कया. खावलाले बसनु तवस्यात धल्ला धुयाथाईन उना. पिसोडी टांगाले खुटीजोगे गया. तठे मन्हा तुटेल सदरा दखी गडी भडकी गया. तोंडना पट्टा चालू व्हयी गया.” सुक्कायना, सदराना चिंधड्या करी लयना. आक्कमाशा मातना का रे तू? नेसालेभी काही भेटाव नही, फिर आते आसाज उघडानागडा.” मी खाले मान घाली सांग, ” सदरा मशीनम्हा आटकी गया, त्याले मी काय करु ?” धल्ला आल्लायना,” कसा काय आटकी गया? तथाज मरी जाता घर कसाले उना ” मी तसाज मिरगीम्हा उठनू, पानी पी वट्टावर जायी बसनू. धल्ला तनतन करत बाहेर निंघी गया. मन्ह भी डोक्स फिरी गय.राय बितनी मन्हावर ते इचार नै. मी यायभर गांड घसस त्यान्ह कवतीक नही. वरथाईन मरी जावानं सांगस. मंग माले आते खरज जगनम नै. मनेमन ठरायी खोलीम्हा गऊ. एंड्रीनना डबा काढा नी गल्लासम्हा वता तोंडले गल्लास लावा नी यक घोट तोंडम्हा ल्हीधा तवसींग दारसे, ” दुनियामे आये हैं तो जीनाही पडेगा ” हायी नागुनं गानं ऐकू उन. रमा ओ रमा आसा तो हाका माराले लागना. मी तोंडम्हा ल्हेयेल एंड्रीनना तो यक घोट तोंडम्हाईन बाहेर फेका. मोराम्हा जायी पानीवरी गुयन्या कयात. मंग सोबतीस संगे घरबाहेर पडनू. सदुना वाडाम्हा जाताज माले भडभडी उनं. मी ढोरना मायक ढसढस रडाले लागनू. रडतरडत तेरोजनी समधी हकीगत सांगी. त्यास्नाबी डोयाजम्हा पानी दाटी उनं. सदु फटकाम्हा चिमनीम्हाईन राकेल काढी लयना. माले ते पीसन वकाले लाव. मंग त्या माले मारुतीना देऊयवर लयी गयात, नी माले सांगाले लागनात ” आपुनआते रातभर आठेज राहूत. रमा, तू डोया लावू नको, डोया लावात तं इष चढस आसी त्यास्नी समज. गमती जमती सांगी त्यास्नी माले बयजबरी जागे ठेव. रातले पोरे कथा गयात हायी दखाले सोबतीस्ना ङरना मानसे दखाले लागनात. माले दखनारा ते कोन्हीज नव्हत. रातले दोनतीन वाजाले सदुना भाऊ मधा नाना आमलेदखत दखत मारोतीना पारवरं उना. त्यान्हासंगे आमी घर गऊत.
पोरबुध परमाने मन्हा सोबतीस्नी मन्हावरं इलाज कयात. त्यास्न पिरेम कायजी यान्ह मोल व्हवाव नै. नेमका टेमले नागु सदु उनात म्हनिसन एंड्रीन पेवान राही गय. सकायले उठी निमनी काडीवरी दात घसी तोंड धोय. पानी पी ल्हीध. थोड बर वाटनं. रातभर मिञस्नी पानी पिऊ दिध नव्हत. आसा तो दिन व्हता. एकज दिनम्हा तिनदाव ‘यम’ मन्हा जोगेथाईन कतरता निंघी गया नी मी मरनना दारम्हाईन फिरी उनू.
मायकरी बाबाना सबदनी याद उनी नी तेरोजना गुरुवारले उपास कराले लागनू. काय येयेल व्हता मातर येय येयेल नव्हती … हाईज खरं.
रमेश बोरसे.
धुळे