लोकशाही अहिराणी कविता
लोकशाही
पडे गोंधळात हल्ली
तुझी माझी लोकशाही…
कुठं आहे लोकतंत्र
डोळे विस्फारून पाही……….1
उभा गणतंत्राआड
अर्थकारणाचा मंत्र…
ज्याच्या मनगटी जोर
तोच हाताळतो यंत्र……….2
नांदे मुजोरीचा जोर
फिरे सराईत चाबी…
तत्वे, नीतिमूल्ये सारी
कडी कोयंड्यात दाबी……….3
धन–दांडग्यांच्या दारी
करे कुर्नीसात सत्ता…
तिथे गड्डीखाली चूप
दिसे हुकूमाचा पत्ता……….4
डोळे दिपवितो पैसा
झाली दिशाभूल फुली …
सण बेंदूरचा येता
टाके रेड्यापाठी झुली ……….5
दिलं मत “दान” जेंव्हा
पुष्ट लोकराज्य दिसें …
मत विकावया रोज
आता आसुसले खिसे……….6
झाला विवेकच षंढ
लोकशाही वांझ झाली…
रूप पांघरूनी तीचं
ठोकशाही फळा आली………7
कुठं लोकशाही आहे
कुठं आहे तिचा वाली…
त्यास शोधतांना अश्रू
वाहे मुकाट्यानं खाली………8
कवी…प्रकाश जी पाटील (पिंगळवाडे)