बैल पोळा:- मूक सृष्टीशी एकरूप होण्याचा सण.
n
n
【 नचिकेत कोळपकर 】
n

n
बैलांच्या निमित्ताने प्राणी सृष्टीशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस. भारत हा सण आणि उत्सवांचा देश आहे. येथे अनेक सण साजरे केले जातात.भारतात जवळपास सर्व सण उत्सव परंपरा या शेतीशी निगडित आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीचे उत्पादन वाढवण्यात गुरेढोरे महत्त्वाची भूमिका बजावतात. गुरांची पूजा करणारा महाराष्ट्र,कर्नाटक ,मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ,तेलंगणा, इत्यादी राज्यात पोळा साजरा केला जातो. बैल-पोळा’ साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्यांचा सारथी, बैल आणि गायींची पूजा करून आभार मानले जातात.श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्ये ला पोळा साजरा केला जातो.महाराष्ट्र आणि राज्याच्या सीमावर्ती भागात शेती ही बहुतांश कोरडवाहू शेती.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली.जून ते सप्टेंबर मध्ये शेतीची कामे या भागात पूर्वी होत असे, आणि या शेतीच्या कामात कष्ट करणारा बैल मोठा सहाय्यभूत होत असे.म्हणून त्याचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा श्रावण महिन्यात साजरा करतात.
n
नुकताच पाऊस पडून गेलेला असतो, वखरणी, नांगरणी, ढेकळ फोडणे , पेरणी, ही कामे संपलेली असतात.या कामात खूप मोठी मदत करणारा बैल, हा थकलेला असतो, त्याचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणातील पिठोरी अमावस्येला बैल पोळा साजरा करतात. कारण पूर्वी या दिवसातच शेती केली जात असे.
n
3 दिवस चालणारा हा सण. पहिला दिवस खांदे मळणी दुसरा दिवस मुख्य पोळा आणि तिसरा दिवस तान्हा पोळा.
n
या सणाचा पहिला दिवस *खांदे मळणीचा. मुख्य पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदे मळणी चा दिवस असतो.या दिवशी बैलाचे खांदे हळद, लोणी, तेल लावून छान मौलिश करतात. बैलाला श्रमपरिहार केला जातो. नन्तर नदीवर नेऊन अंघोळ घालतात.सजवतात.देवळात नेऊन शिंगाला बाशिंग बांधतात.गोंडे लावतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे मुख्य पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलाची पूजा करतात, गोड धोड करून बैलाला खाऊ घालतात. बैलाला शेतकरी भाऊ मानत असतो. या दिवशी शेतकरी स्वतःच्या हातावरची राखी काढून ती बैलांच्या शिंगाना बांधतात.आया बहिणी सुध्दा बैलाला राखी बांधतात. यादिवशी काही ठिकाणी पूरण पोळी असते पण काही ठिकाणी गुळाच्या पुऱ्या करतात. ज्यांचे घरी बैल नसतात ते मातीचे बैल तयार करतात.त्यात 3 बैल, एक गाय-वासरू, एक घोडा, असे असते.शेतीत उपयोगी प्राणी सगळे. पाटावर मांडतात, शिंगांना राखी बांधतात.गुळाच्या कणकेच्या रिंग तयार केल्या जातात आण त्या बैलांच्या शिंगात बाशिंग म्हणून घालतात.त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.या दिवशी बैलांकडून कोणतेच काम करवून घेतले जात नाही. घरी पाळलेले बकरी, म्हैस यांची पण पूजा होते.तिसरा आणि शेवटचा दिवस म्हणजे तान्हा पोळा. हा लहान मुलांसाठी असतो. लहान मुले लाकडाच्या बैलाची पूजा करतात. त्या निमित्ताने लहान मुलांवर सजीव सृष्टीशी एकरूप होण्याचे संस्कार होतात.महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो.या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. पोळ्या प्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. मानवाला जगण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व मूक सृष्टीशी एकरूप होण्याचा हा सण. पोळा सणाच्या सर्वाना शुभेच्छा.