कान्हदेश संस्कृती आनी आखाजीना सन
आपल्या भारत देशात विविध भागात विविध कला, सांस्कृतिक सण आणि उत्सव नित्यनेमाने साजरे होत असतात, महाराष्ट्रातील खान्देश(कान्हदेश) संस्कृतीहि विशेष लक्ष वेधून घेते.
स्वतंत्र कला सांस्कृतिक वैशिष्ट्ये असणारा खान्देशातील सुमारे इ.स..६०० ते ११०० या काळात उदयास आलेल्या ‘आभीरी’ अहिराणीचे प्राचीनत्व ते आहिर राज्यांच्या काळातील भाषा संस्कृती काहींच्या मते कान्हाचा प्रदेश कान्हदेश, काहीं संशोधकांच्यामते कान राजाचा देश खान्देश तर शुभंकर, इष्टदेवता खान्देश ग्राम दैवत कानबाईच्या सण उत्सवावरून कान्हदेश असा खान्देश अपभ्रंश खान्देश, ह्या आपल्या खान्देशातील चालीरीती बदलते व्यवहार, आचार, विचार आणि जनजीवन तरीही खान्देशचा आखाजी सणाच्या माध्यमातून जुन्या प्रथा परंपरा आजतागायत खान्देश संस्कृती जपण्याचा आणि रुजविण्याचा प्रयत्न करणारा सण अक्षय तृतीया म्हणजे “आखाजी“
खान्देशात सांस्कृतिक इतिहासात अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्यात कानबाई, गुलाबाई, आसरा, भालदेव, मरीमाय इत्यादी परंतु हे सण कमी कालावधीत संपन्न होतात, दिवाळीनंतर सहा महिन्यांनी येणारा सासुरवाशीन स्त्रियांना निवांत माहेरी येऊन मनमुराद आनंद उत्साह देणारा सासुरवाशीनींचां सण, शेतकऱ्यांना नवीन धोरण आखण्याचा, सालदाराचे साल ठरविण्याचा हा सण,व्यापाराची नवीन व्यवहार सुरू करणारा हा सण आणि वाडवडिलांच्या पुण्यकर्माचे स्मरण करणारा हा सण,
आखाजी निमित्ताने खान्देशात आदर उत्साहाने पितरांना श्राद्ध घालण्यासाठी घरोघर लगबग सुरू होते, कुंभार बांधवांकडून आकाराने लहान मोठे दोन मडके (घल्ली) आणून गव्हावर भरलेली घागर वा नवा माठ ठेऊन त्यावर छोटी मडकं त्यावर डांगर वा सांजरी ठेऊन फुलांची माळ लावून घराचा उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर चंदन हळद कुंकूने पितरांच्या आगमनासाठी पूजन केले जाते.
पुरणपोळी, आमरस, काळ्या मसाल्याची आमटी भात, कुरडई भज्या असा नैवेद्द ठेऊन माठाची विधिवत पूजा करून चुलीतील विस्तवावर पितरांना एक एक घास ठेऊन त्यांना जेवायला आमंत्रणं देऊन तूप टाकून पाणी ओवाळून सारे घरदार जेवायले बसतात,हि पवित्र प्रथा परंपरा समस्त खान्देशात आजही सुरू आहे.
सासुरवाशीन माहेरी आल्यावर गल्लीतील गावातील कोण कोण आल्यात त्याच्यात रमतात,निवांत मौज, मस्ती आणि थट्टा मस्करी करत सर्व सहिबहिनी मैत्रिणी चिंचेच्या वा लिंबाच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर गौराई आखाजीचे पारंपारिक लोकगीते म्हणतात,
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं,
कैरी तुटनी खडक फुटना झुय झुय पानी व्हाय वं,
आणि
आखाजी सारखा सण म्हना टिपरना खेवाना
अशी एकापेक्षा एक मस्तच गाणी म्हणतात,गावातील मुलींचा उत्साहाचा सण गौराई चैत्र पौर्णिमेनंतर घरोघरी पारंपरिक पद्धतीने गौराईची स्थापना करतात, गौराई चंदनाच्या किंवा सागाच्या लाकडाने बनविलेली एक फुटाच्या दोन लाकडावर अश्वाचे चित्र कोरून ते आडव्या लाकडाने एकत्र केलेला झोका असतो,
चैत्र चतुर्दशीला द्वितीयेला गावभरच्या बायका, मुली एकत्र येतात.पारंपरिक पोशाखात नटून थटून शंकर पार्वती आणायला कुंभाराच्या घरी जातात.
विविध गाणी म्हणत आनंद द्विगुणित करत,
गवराई चालनी चालनी गंगेवरी….
काय मांगस मांगस ताटभरी….
गवराई चालनी, चालनी गंगेवरी
नारय मांगस मांगस ताटभरी….
सोबतीच्या मैत्रीनींची चेष्टा करण्यासाठी…
कोनी गौर वकनी, वकनी – केये खाई डखनी डखनी
मैनानी गौर वकनी, वकनी, केयी खाई डखनी, डखनी…
अशी ही मजेदार गाणी म्हणत गवराई सजवून टरबुजाच्या बियांच्या भुईमुगाच्या शेंगांचे हार गौराईस टाकत विविध सजावट करतात, कुंभार दादांकडून आणलेले शंकर पार्वती शेजारी ठेवतात,
गौराई आखाजीचा दुसरा दिवस हा गौरी विसर्जनाचा असतो.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आखाजी सण मायेचा गारवा देणाऱ्या खान्देशी प्रथा परंपरा मायमाऊलींच्या सन्मानाचे प्रतीक दर्शवून जाते, आठ दहा दिवस एकमेकांना भेटून सासुरवाशीन स्रियांना आई वडील भाऊ यांना बहिणीच्या भेटीने अक्षय आनंद देणारा हा आखाजी सण साजरा करून गौराईस शंकर घ्यायला येतो म्हणजेच जावाई मुलीस सासरी घायला येतात.
खान्देशातील कानबाई उत्सव, आखाजी गाणी, लग्नातील तेलन दामेंडा आणि म्हणी हा अनमोल संस्कृतीचा ठेवा घराघरातील बहिणाबाईंच्या लेकींनी हे अलिखित सोनं आजपर्यंत टिकवून असंख्य संशोधक यांनी लिखित स्वरूपात मांडायला सुरुवात अनेक वर्षांपासून सुरुवात केली आहे, नेट जगतातही मस्त माहिती उपलब्ध आहे, जाणकार आणि सर्वांच्या साह्याने हा ठेवा आपल्या खान्देशी लोकांपर्यंत पोहचवतोय,
आजच्या धावपळीच्या युगात, माझं तुझंच्या लढ्यातही आपली संस्कृतीचा अनमोल ठेवा याचा आदर राखत ही वैभवशाली पंरपरा आपण जपून पुढे नेऊ हिच मनोकामना,
कान्हदेश आखाजी हाऊ आपला अहिरानी संस्कृती संवर्धन दिन म्हनीन साजरा करूत,
काळाच्या ओघात या आखाजीचे स्वरूप बदलत चालले मात्र प्रथा परंपरा काळजात जपू यात.
लेफ्टनंट डॉ.जितेंद्र देसले,
कान्हदेश अहिराणी कस्तुरी मंच,