खान्देशी सण आखाजी जागतिक अहिरानी लोकवाड.मय दिवस
आखाजी अर्थात अक्षय तृतीया सणाला गौराई हे खानदेशातील स्त्री लोकदैवत स्थापन करून उत्सवाच्या स्वरूपात मिरवले जाते. गौराई हे प्रसिद्ध दैवत असून त्याचा उत्सव आनंदाने साजरा होत असतो. वैशाखात अक्षयतृतीयेला गौराईची पूजा करतात. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीला खानदेशात गावागावात घरोघरी गौर मांडली जाते. सासूरवाशिणी या उत्सवाला माहेरी येतात. अहिराणीत गौराईला ‘गवराई‘ म्हणतात. गौराई हे पार्वतीचे रूप मानले जाते.
रानावनातील संस्कृतीचा भाग असलेला खान्देशी संस्कार वनांच्या सानिध्यात असल्यामुळे गौर ही लाकडाची केलेली असते. गौराईचा मुखवटा लाकडावर कोरलेला असतो. लाकडी फळीवर सुंदर कोरीव काम केलेले असते. तिच्या आसनाला दोन घोड्याची तोंडे असतात.

ती बंगळीवर बसलेली असते. गौराई ज्याठिकाणी मांडतात किंवा बसवतात, त्या ठिकाणी नक्षीकाम करतात, चित्रे काढतात, सजवतात. बीजचा शोध स्त्रीने लावलेला असल्यामुळे गौराईला बियांच्या माळा अधिक प्रमाणात घातल्या जातात. ज्यामध्ये टरबूज, खरबूज, वाईक (काकडी), भुईमुगाच्या शेंगा, सौंदळच्या शेंगा, व विविध पदार्थांच्याही माळा तयार करून गळ्यात परीधानर केल्या जातात. मुली टिपऱ्या घेऊन व डोक्यावर तांब्या घेऊन नदीवर गाणी गात गात जातात. तांब्यावर आंब्याची पाच पाने ठेवून त्यावर कैरी ठेवतात. त्याआधी त्या तांब्यात पाणी भरतात. त्या तांब्याला ‘हवन’ म्हणतात. भारतीय उपखंडात व्दिपकल्पीय पठारावरील खान्देशातील स्थान प्रमुख पर्वत,पठार,मैदान तथा नद्यांनी समृध्द असल्यामुळे येथील लोकगीतांमध्ये या नैसर्गिक घटकांचा प्रतिमा तथा प्रतिके म्हणूनही वापर झालेला दिसून येतो. भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी म्हणून ज्या तापीचा उल्लेख केला जातो त्या तापी नदी काठावरील मृदेचाही गोडवा गाणारी लोकवसाहत या खान्देशाचे वैशिष्ट्य आहे.
खान्देशी सण आखाजी
“*तापी काठनी चिकन माती, तिना वट्टा बांधू वं माय,
हावू वट्टा चांगला ते, त्यावर घट्या मांडू वं माय..
हावू घट्या चांगला ते, त्यावर सोजी दवू वं माय।
हाई सोजी चांगली ते, तिन्ह्या सांजऱ्या करू वं माय,
त्या सांजऱ्या चांगल्या ते, त्या गवराई ले देवू वं माय”..
पुन्हा ‘सांजोऱ्यांऐवजी इतर अनेक पदार्थाची नावे त्यात सांधून पुन्हा हे गीत म्हटले जाते. निसर्गाविषयीची ओढ, माय मातीच्या संस्कारातून उमलणारी कवने व अनेक स्त्रीगीतातून दिसून येते. नदीचं झुळझुळ वाहणं, वाऱ्याचा मंद स्वर, आंब्याच्या डहाळ्याचे झोके, पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट व चिमुकल्या लेकरांचे बागडणे असे निसर्गातील सुमधूर नादात महिला बघिणींच्या गीताचे विषय होत असतात.
व्याही भाऊ तुले मी गावू
वाटवर आंबा नको लावू
मनी गवराई लेकुरवाई।
आंबानी शेंदय व्हई।
या गीतातून निसर्गाची कलाकृती म्हणून संबोधली जाणारी बोर, बाभळी, पेरु, जांभूळ इ. झाडांची नावे घेतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी नदीवर पाणी आणायला जातात. हे पाणी आणायला जात असताना एक ताई म्हणते की,
कढी उकाऊ, मढी उकाऊ, ये रे संकर जेवाले।
संकर ऊना जेवाले, गवराई ऊनी लेवाले।
तर दुसरी माई म्हणते की,
कढी ऊकावू मढी उकावू ये वं गवराई जेवाले।
‘गवराई’ उनी जेवाले ते, संकर उना लेवाले।
यापध्दतीने गीत गाताना आनंदाचे भरते येते. मुली उत्साहाने हे सर्व करत असतात. त्यांच्या डोक्यावर तांब्यावरती आंब्याची पाने घेऊन येताना त्या गीत गातात-
आथा आंबा तथा आंबा, कैरी झोका खाय वं।
कैरी तुटनी खडक फुटना, झुई-झुई पानी व्हाय वं
झुई-झुई पानी व्हाय तठे, रतन धोबी धोय वं ।
रतन धोबी धोय तठे, कसाना बजार वं
रतन धोबी धोय तठे, तोडास्ना बजार वं
माय माले तोडा ली ठेवजो, बंधूना हातखाले दी धाडजो…
तोडा, पाया, तोडल्या, चितांग, कब्रटीक, वेल्या, गाठलं, एकदाणी पुतळ्या यांसारखे खान्देशी दागिण्यांची नावे त्यात गुंफून गीताची लांबी लांबत असते. इतरही पध्दतीने मुली सर्व गीत गातात..
आथी आमराई, तथी आमराई मधमा वाहे पानी
तठे मनी गवराई, गवराई काय काय इसरनी।
तठे मनी गवराई पाटल्या इसरनी।
मायमाय संकरले संकरले तिन्ही याद उनी।
गौराईच्या गाण्यातून तीच्या साज सौंदार्यांची स्तुतीकवणे गायली जातात. भाऊ घ्यायला आल्यानंतर तो खालीहात परत जायला नको याची देखील ती बहिण काळजी घेते..
सरी गे दयन, दयामा मी व्हयनू दंग,
लय आक्का ले आखाजीले पांडूरंग..
आखाजीना सन, नका परतवा मुराई,
बहिनना बिना, भाऊ किलावना जाई….
लाल माटीनी घाघर, आज तुल्हे मान,
थंड पानी पिसन, जीव कुदे आनंदम्हान…
आखाजीना दिन, घल्ल्या भरा कोऱ्या,
खा खीर पुऱ्या, व्हा झोकाले नवऱ्या…
आज आखाजी आखाजी, करा लढाई बयेबय,
मारामारी टिपऱ्या खेवा, आना आंगमा नवं बय……
गौराईचा स्वयंपाक करतांना टिपऱ्यांच्या तालावर देखील गीत गायले जाते. आणि या गीतातून आहारातील साधेपणा दिसतो.
घाऱ्या रांधू पुऱ्या रांधू, ये व गवराई जेवाले।
गवराई बसनी पुऱ्या खावाले, संकर उना लेवाले।
डेरा ठेवू पुऱ्या राधू, ये रे संकर जेवाले।
‘संकर’ ऊना जेवाले ते, गवराई ऊनी लेवाले।
आहाराचे आणि नात्याचे गोडवे येण्या-जाण्याच्या पध्दतींना अधिक समृध्द करतात. आणि हे सर्व ज्या झोक्यावर बसून गायले जाते त्यासाठी गौराईच्या उत्सवाला खान्देशात घरोघरी हलकड्यांना किंवा झाडांना झोके बांधले जातात. पारासमोर, गावाच्या चौका-चौकात, पांढरीतल्या झाडांना, खळ्यातील झाडाला झोके बांधून आधिकाधिक उंच हेलकावे घेतले जातात. झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून स्त्रिया गाणी गाताना विनोदाचीही झालर लावतात.
पाटलावरनं नारय, नारय खुयखुय वाजे।
तठे मनी गवराईले, गवराईले काय काय साजे
तठे मनी गवराईले, गवराईले तोडा साजे
तोडास्ना भर जोडा, भर जोडा वाजे चौघडा, वाजे चौघडा।
या गीतातील स्त्री अलंकारांची नावे गुंफलेली आहेत. स्त्रीयांच्या भावभावनांचे व दागिण्यांचे नाते उत्कटतेने मांडलेले असते. प्रत्येक गायलं जाणारं गीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारं असतं. त्या प्रत्येक गीताची आशयगर्भ मांडणी वेगळा सूर व ताल घेवून येत असते.
दारे सोनाना पिप्पय वं माय, सोनाना पिप्पय,
त्याले काय चांदीन्या हालकड्या वं माय, चांदीच्या हलकड्या..
त्याले काय, सोनाना पायना वं माय, सोनाना पायना,
त्याले काय रेसमनी दोरी वं माय, रेसीमनी दोरी..
त्यावर बसनार कोनता हारी वं माय, बसनार कोनता हारी,
त्याले झोका देनार, गवराई नारी वं माय, देनार गवराई नारी….
बापाच्या दारासमोर सोन्याचा पिंपळ बहरलेला माहेरी आलेल्या सासूरवाशीनीला भुरळ घालतो म्हणून त्या पिंपळाला झोक्यासाठी खास अडकविण्यात आलेल्या हलकड्या देखील चांदीच्या असल्याचे ती महिला वर्णन करते. एवढ्यावर ती थांबत नाही तर त्याला रेशमी दोरीने झोका दिला जातो असे वर्णन करताना शंकर व गौराईच्या सन्मानाची गीतरचना प्रकटते. ज्याव्दारा विविध प्रतिमा वापरून प्रतिकात्मक जीवंतपणा येतो. ‘गवराई’ म्हणजे पार्वतीचे रूप असल्याचे या गीतांतून दिसून येते. तसेच बहुतेक गीतांत नदीशी संबंधित विधी असतात. नदी हे पार्वतीचे प्रतीक असून तिचा अनुबंध पुराणकथेत सांगितला जातो.
एके ठिकाणी सर्व गौराई जमवितात व रात्रभर गाणी गातात. यालाच ‘गौर जागवणे’ असे देखील म्हणतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे आखाजीच्या दिवशी दुपारून त्या त्या गावातील मुली शेजारच्या गावाच्या दिशेने निघतात. जाता जातांना गीत गातात..
सात दिनना धना, धना मन्ह्या बहिनीस्ना डोकाले,
भावू उना माय लेवाले, कशी जावू कपाशी येचाले.
सात दिनना धना, धना मन्ह्या बहिनीस्ना डोकाले,
बाप उना माय लेवाले, कशी जावू शेंगा येचाले.
सात दिनना धना, धना मन्ह्या बहिनीस्ना डोकाले,
चुलता उना लेवाले, कशी जावू मिरच्या तोडाले.
सात दिनना धना, धना मन्ह्या बहिनीस्ना डोकाले,
मेव्हना उना माय लेवाले, कशी जावू कांदा खांडाले…
अशा विविध कामांना मूठमाती देत माहेरी आलेली लेक आता गौराईच्या अंतिम प्रवासात साथीदार होते आणि शेजारील गावाच्या वेशीच्या दिशेने जाते. नदी, रस्ता, रेल्वेरूळ, किंवा अजून ज्या काही गाववेशीला विभागणाऱ्या रेषा असतील तिथपर्यंत जातात आणि समोरासमोर उभ्या ठाकतात. एका गावातील मुली एका बाजूला तर दुसऱ्या गावातील मुली दुसऱ्या बाजूला उभ्या राहतात व एकमेकींना खुनावत गाणे म्हणतात. या गाण्यातून थट्टा मस्करी केली जाते. एकमेकींना उद्देशून बोलतात.
पाटीलले उन जर, बत्तीले लागन वारं
सरपंचले उन जर, बत्तीले लागन वारं
पोलीसले लागनी भीक, बायकोले इक……
व
कोनता गावना तांगावाला छोकरा
उतरान गावना तांगावाला छोकरा
तांगामा बठनी कोनती नार वं
तांगामा बठनी पाटीलनी नार वं
तिले लयी पयना तांगावाला छोकरा वं
पाटीलनी इज्जत, इज्जत गयी वं
या पध्दतीने थट्टा,मस्करी करत जणू काही लैंगिक शिक्षणाचेही धडे नव्या पिढीला दिले जातात की काय याचीच ही ग्रामीण संस्कृतीची प्रचिती येते. चैत्र महिण्याच्या चतुर्दशीला अर्थात चावदसला सुरू झालेला हा उत्सव अक्षय तृतीयेला म्हणजेच आखाजीला संपतो. बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार यांच्या आयुष्यातील नवीन वर्ष आणणारा व आपल्या वर्षभराची मजूरी म्हणून गव्हाई प्राप्त करून देणारा सण आहे. या सनाच्या निमित्ताने विविध कवणांमधून स्त्रीगीतांची निर्मिती तर होतेच पण सोबतच लोकवाङमयाला समृध्दी मिळत असते.


खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडवणारा, सालदार, महिनदार, गावखेड्यात राबणाराऱ्या हातांना गव्हाई, साल व महिण्याच्या मजूरीचा हिशेब टिशेब करून वर्ष बदल करणारा दिवस, सासूरवाशीणीने माहेरी हक्काने येऊन लोकवाड.मयाची मेजवाणी पेरणारा सांस्कृतिक महोत्सव, सारसामान करून त्यातून नव्या नवलाईचे गीत गाणारा दिवस, लग्नसराई, मान्ता, अर्थातच तोरण आणि मरणाच्या कवणाला उजागर करणारा लोकसाहित्याचा कळस चढवणारा दिवस म्हणजे आखाजी… आखाजी नावाने ओळखला जाणारा हा साहित्य व ओवी वाड.मयाचा अनमोल खजिना जपून ठेवणारा दिवस असल्यामुळे गेली वीस वर्ष खान्देश साहित्य संघाच्या माध्यमातून अहिरानी लोकवाड.मय दिवस साजरा व्हावा यासाठी आजदेखील आखाजीचा सण त्याच अंगाने साजरा करण्याचा सर्व साहित्यिक विचारवंत व अभ्यासकांची धारणा असल्यामुळे आपण आपल्या स्तरावर या दिवसाला जागतिक अहिरानी लोकवाड.मय दिवस म्हणून साजरा करूयात….
डॉ.सदाशिव सुर्यवंशी
(अध्यक्ष-खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य,धुळे)
9405371313
सर्वांना आखाजी (अक्षय तृतीया) या जागतिक अहिरानी लोकवाड.मय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा