Aakhaji kavita आखाजी कविता

Aakhaji kavita आखाजी कविता

अहिरानी बोली भाषेतील ई कविता संग्रह ‘मन्ही खान्देशी बोलनी’ म्हाईन

  उनी मन्ही गवराई


        उनी मन्ही गवराई
उनी आखाजी व उनी
उनी मन्ही गवराई
हिले देखिनी फुलनी
        आमराई वनराई॥धृ॥
आमराई म्हा रवाले
उनी मन्ही गवराई
हिले आंबाना रसनी
     काय सांगू आपूर्वाई ॥१॥
मीबी  करसू वं हिले
रस पुरननी पोयी
आंबा लयसू व मीबी
    सवादना जाई जोयी॥२॥
झोका बांधता निंबले
देखा पिकनी निंबोयी
देखीसनी हारखनी
    मन्ही गवरायी भोयी॥३॥
नही आनंदले सिमा
झोका अंबरले जाई
मन्ही रमनी वं आशी
       माहेरम्हा गवराई ॥४॥
येता येता माहेरले
गहिवर दाटी येई
जाता जाता सासरले
        दोन्ही डोया भरी येई॥५॥

निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
शब्दार्थ  :- गवराई =गौरी, हिले=हिला,देखिनी=बघून,  फुलनी=फुलली, आमराई =आंब्याचा बगिचा, आमराई म्हा =आमराई मधे, रवाले=खेळायला, आंबाना=आंब्याच्या, रसनी=रसाची, अपूर्वाई =विशेष आवड, पुरननी=पुरनाची, पोयी=पोळी, लयसू=आणेल, सवादना=स्वादाचे-चवीचे, जायी जोयी=शोधून-निवडून, निंबले= निंबोणीच्या झाडाला, निंबोयी=निंबोणी(छोटी छोटी पिवळी फळ), हारखनी=आनंदली, भोयी=भोळी, अंबरले=आभाळाला, रमनी=रमली, गहिवर=हूरहूर, डोया=डोळे, भरी येई=भरुन येती.

याद आखाजी लयस

याद आखाजी लयस


         याद आखाजी लयस
माय काय सांगू तुले
आखाजीले याद उनी
तुन्हा भेटना करता
         तुन्ही गौराई झुरनी॥धृ॥
घर घर नी गौराई
देख माहेरले उनी
कधी धाडशी व मूय
             हुरहुर बी वाढनी॥१॥
आठे सासरना घर
घरंघरं व सदानी
जीव उबगना मन्हा
          बोल बठ्ठा ऐकीसनी॥२॥
नंदा- भाशा बी येतीस
घर जास भरीसनी
तरी आखाजी से सुनी
           देख तुन्ही गौराईनी॥३॥
याद आखाजी लयस
झोका वरना गानास्नी
खेयं चाले टिपरीस्ना
          माय तुन्हा आंगननी॥४॥
      निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जयगांव.
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.

शब्दार्थ:-तुले=तुला, आखाजीले =अक्षय तृतीयेला, तुन्हा =तुझ्या, भेटना करता=भेटीच्या साठी, झुरनी=हुरहुरली, घर घर नी=घरोघरची, उनी=आली, धाडशी=पाठवशिल, मूय=मूळ, आठे=इथे, सासरना=सासरच्या, उबगना=कंटाळला, बठ्ठा =सर्व, नंदा-भाशा=नणंदा-भाच्या, येतीस=येतात,जास=जाते,भरीसनी=भरुन, से =आहे, लयस=घेऊन येते, झोकावरना=झोक्यावरच्या, गानास्नी =गाण्यांची, खेयं =खेळ, टिपरीस्ना =टिपर्यांचा, आंगननी=अंगणाची.