माय
तुन्हा आज ७१ सावा जन्मदिन, तुन्हा जनमदिन म्हणजे आम्हना करता दिवाई ह्राहे… पण तु दोन वरीस पयलेज दिवाई नी पंती मल्हायीसन चालनी गयी.. ह्या दोन वरीस मजार आसा एक बी दिन आसा गया नही की, तुन्ही याद उन्ही नही.
माय तुन्हा संघर्ष, तुन्हा कष्टानी शिदोरी मन ना भात्यामा बांधी ठेल शे… माय तु आस जावाले नको व्हत. तुन्ही सासष्ठी करी तव्हय कितला आनंद व्हयेल व्हता तुल्हे काय सांगु… तुन्हा आम्रुत महोत्सव आम्ले मनाळना व्हता…आज बी उभेउभ डोयाना समोर दिसस… जव्हय बी संकट येस, मन खट्टू व्हस, निरवस व्हस तव्हय तुन्ही गयरी याद येस. परतेक सुकदुक नी गोट तुल्हे सांगता ये. तुन्हा खांदावर डोक ठीसन रडता ये. मन हालक व्हये. ह्या वयमा बी तुन्ही मांडीवर डोक ठेवता ये. तु गयी नी मन्ह बठ्ठ सरी गये… आख्ख जग मनाकरता शून्य झाये.
माय, माल्हे रोज सपन मा यीसी… काही तरी बोलसी, देवबाप्पान्या घरन्या गोष्टी सांगशी, पण तु गयी आणि निष्ठुर व्हयनी… जुना लोक खर सांगतस माणुस ग्या की, तो देवबाप्पाना व्हस. बठ्ठ इसरी जास. तुन्ही ते मज्या व्हयीन, आण्णा शे, मामी शे, भिमादादा शे, जन्यामावशी शे, चित्रामावसी शे… आणि हा मन्हा बाप बी भेटना व्हयीन…. इतल धनगोत तुल्हे भेटावर कसाले याद यीन माय तुल्हे… तुम्ही बठ्ठा तठे मस्त राघो शाळा भरावतस व्हतीन, आम्हनी शाय मातर बंद करीसन गयी.
आणि हा मन्हा बापले भेटशी ते रागावजो नको… आठला बठ्ठा निरोप सांगजो. बापनी तुल्हे नही समज, पण तु समजी लेजो. तु समिंदर शे, बठ्ठ मायपोट तुन्हा मजार समाई लेस. काय लिखु, कितल लिखु.. तु ते काही वाचाव नही. पण तरी बी वाटन आज मायना जन्मदिन शे, मायना संगे दोन सबद बोली लिवु… बाकी तुन्ही जागा मन्हा आप्पा भरी काढस, तेन्हा मजार मी तुल्हे शोधी काढस…. शेवटला जनमदिन साडी नेसी लेजो… आते काय साडी चुयी तुन्हा लगुन भिडाव नही… तुल्हे ७१ सावा जनमदिनन्या ह्रिदयमाइन आभायभर हार्दीक शुभेच्छा….. ७१ म्हणजे कितला माहित शे…. नही ना… ओ माय ७० आणि १ म्हणजे ७१…. कशी गुलुगुलु हासस…. हायी हासानीज तुन्ही याद यस…
आते काही लिखावस नही…. वाटस तुन्ही भेटले शे तसाज निंघी येव्हो…. नक्की यीसु, तुन्हा काया फुटाना, खमंग, बारीक शेव लयी येसु…..
माय तुल्हे कोटी कोटी प्रणाम!