भाऊसाहेब हिरे यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे

भाऊसाहेब हिरे यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे

खान्देश रत्न, शिक्षण महर्षी, कर्मवीर, लोकनेते, संयुक्त महाराष्ट्राचे जनक स्व भाऊसाहेब हिरे यांना खान्देश हित संग्राम कडुन कोटी कोटी अभिवादन
भाऊसाहेब हिरे यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे
सहकार तत्त्वाच्या माध्यमातून विकासाचा ध्यास घेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी समाजकारण केले. जागतिकीकरणाच्या काळातही सहकार तत्त्वाचे हे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित होत आहे. एक मार्च
सहकार तत्त्वाच्या माध्यमातून विकासाचा ध्यास घेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी समाजकारण केले. जागतिकीकरणाच्या काळातही सहकार तत्त्वाचे हे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित होत आहे.सहा नोव्हेंबर रोजी भाऊसाहेब हिरे यांची ५८ वी पुण्यतिथी . यानिमित्त दुर्बल समाजाच्या उत्कर्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या सहकार चळवळीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा

जमीनदारी व सावकारशाहीमुळे नाडलेला शेतकरी आणि उत्पन्नाची खात्रीची साधने नसलेला दरिद्री कष्टकरी समाज यांचे दु:ख भाऊसाहेब हिरे यांनी जवळून बघितले होते. ते स्वत: शेतकरी असल्यामुळे ग्रामीण समाजाची आर्थिक दुर्दशा तसेच त्या मागची कारणे त्यांना अवगत होती. या पिचलेल्या वर्गाची आर्थिक पिळवणूक थांबविल्याशिवाय सामाजिक विकास शक्य नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणूनच त्यांनी या सर्वाच्या उत्कर्षांसाठी ‘सहकार’ तत्त्वज्ञानाची कास धरली. भाऊसाहेबांनी सहकाराच्या माध्यमातून उभे केलेले काम भांडवलशाही व शोषणशाहीच्या विरोधात होते.

आदर्श समाज निर्माण व्हावा अशी त्यांची प्रामाणिक तळमळ होती. शेतकऱ्यांचे सावकार वा व्यापाऱ्यांवरील विसंबित्व कमी व्हावे म्हणून भाऊसाहेबांनी सर्वप्रथम खरेदी-विक्री संघाची स्थापना केली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम १९२८ पासून बंद होते. तत्कालीन परिस्थितीत बॉम्बे प्रॉव्हिन्सियल को-बँकेच्या शाखांमार्फत कर्ज वाटप होत असे. परंतु हे कर्ज अत्यल्प व मर्यादित असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागे. ही कोंडी फोडून शेतकऱ्यांची स्वत:ची बँक असावी, यासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे १९५५ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या बँकेमुळे जिल्ह्यात सहकार चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून देणारा पाया घातला गेला. प्राचार्य पुराणिक, दगा पाटील, दादासाहेब बिडकर यांच्यासारख्या सहकार क्षेत्रातील दिग्गजांची त्यांना साथ लाभल्याने सहकार चळवळीचे जाळे जिल्हाभर निर्माण होऊ शकले.

खासगी उद्योजकांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: उद्योजक बनावे असे त्यांचे स्वप्न होते. ऊस, कापूस, तेलबिया यांसारख्या कृषी उत्पादनावर सहकार प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी सहकारी कारखानदारीस उत्तेजन दिले. वैकुंठभाई मेहता, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेबांनी दाभाडी येथे गिरणा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. निफाड, राहुरी यांसारख्या साखर कारखान्यांच्या उभारणीतही त्यांचे मार्गदर्शन लाभले. सहकारी साखर कारखाना, सहकारी पतसंस्था, बँका, सहकारी सूत गिरण्या, सहकारी खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार यांसारख्या संस्थांच्या उभारणीसाठी भाऊसाहेबांनी उपसलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहेत. त्यामुळेच गोरगरिबांचे कैवारी व सहकारमहर्षी अशी त्यांची चिरंतन ओळख निर्माण झाली.

आज सहकार चळवळीला अवकळा प्राप्त झाली आहे. स्वार्थी वृत्ती वाढीस लागल्याने सहकार तत्त्वाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे.

अशा वेळी पुन्हा भाऊसाहेबांनी घालून दिलेला आदर्श सहकार तत्त्वाचा मार्ग अंगीकार करण्याची निकड नक्कीच जाणवते