देवनं इवान येवाना पह्यलेंग पोरगा वू (व्हवू) आमले दोन्ही जिवस्ले खराखातीना इवानम्हा फिरायी लयनात भो
देवनं इवान ल्हेव्हाले येवाले मी काही संत तुकाराम नै त्यान्हा मतलब इतलाज मन्हा डोया मिटाना पह्यलेंग.
बराज दिनम्हा लिखानं मन व्हयनं म्हतारपनम्हा इसराले व्हस, आयस भरायी जास, लिखाम्हा चूका व्हतीस त्यामुये आज लिखू सकाय लिखूम्हा भलता उसिर व्हयी गया. परतेक पहिली गोटना मानुसले भलता हारिक रहास जसं पह्यल पिरेम,पह्यली कविता, कथा, लेख तसा हायी मन्ही पह्यली इवान भरारी. कोन्ही म्हनी काय मोठ कवतुक, लाखो लोक रोजच इवानम्हा देस इदेसम्हा इवानम्हा जातस खरं से ते… मातर सोतानी कारम्हाभी फिरेल नव्हतूत आमी. फकत सायकल मोटरसायकल एस.टी. नी लालगाडी यवढीज आमन्ही मजाल व्हती त्यामुये मी हारकायी गऊ भो.
पूनाथाईन यकरोज पोरगाना फोन उना, आपले थोड इवानवर फिराले जावानं से तुमी आथा यी लागा. मी म्हंत बेटा यंदा आपला भलता खर्च व्हयेल से फ्लॅट, तुन्ह लगीन,कार त्यामुये दखूत मव्हरे. मातर तो म्हने पप्पा तिकीटे बुक करायी जायेल सेत. मंग ऐकनज पड. धाकटी पोरगी तव्हय धुय्यालेज व्हथी. तिन्ही त्याले सांग तुमी मंबई थाईनज बसाव सेत मंग मी ममी पप्पाले मन्ही गाडीवर मंबईले लयी जास. तुम्ही दोन्ही जिव तठे या मंग निंघा तठेंग.
इस मे ले आमी पोरगी सोबत बेलापूरले नवी मंबईले गऊत. तठेज चार दिन आराम कया पाहूनचार झोडा. चोविस तारीखले रातले पोरगा वू उनात. पंचवीस तारीखले सकायम्हा दोन वाजेले तठेंग ओला गाडीवर आंतरराष्ट्रीय इवानतयवर गऊत. तठल्या तपासन्या तापासन्या व्हयन्यात. आबब कवढ मोठ्ठ इवानतय से भो ते. भारतम्हान मोठाम्हा मोठ इवानतय से भो ते. तठे भलती महागाई चेटनी भो. वडापाव समोसा १६० रुप्या चहा काफीभी देडसे रुप्या. मास्तर मानुसना आवखातना बाहेरली गोट भो. सकायम्हा सव वाजता कोईमतूर जावाले इवान उन. इवान सुरु झाय आनि आमनी धडधड वाढनी. ते वर उठताज जिव कसासाजं करी उठना आंगम्हा थोडस कापरं भरायनं. तसा बेल्टबिल्ट बांधेल व्हथा. मातर थोडा ये म्हा मज्या वाटाले लागनी. बायको मन्हाकडे दखी गालम्हाज हासनी आनि सांगाले लागनी दखा तुमनासंगे इतला वरिस सवसार कया तुमी माले सोतानी कारवर भी फिरायै नै. पोरगावर भारी भरी राह्यंती तिन्हा डोयाजम्हा पोरगानं कवतुक दिखी राह्यंत. मालेभी तिन्हा उजायेल चेहरा दखी आनननज झाया, मन्हीभी छाती थोडी फुगी गयी. घंटाभरम्हा आमी कोईमतूर ले भिडनूत. तठला इवानतयना बाहेरज राऊनी म्हंजे पोरगानी पह्यलेंगज बुक करेल गाडी उभी व्हथी.
कोईमतूर परिसरम्हा नामी नामी ठिकाने दखत दखत परवास चालू व्हथा. कोईमतूर ले इशा फाऊंडेशन ले गऊत तठे आमी मझार बैलगाडीवर गऊत. आदित्ययोगीनी भलीमोठी उच्चीतडांग मूर्ती से. तठे फोटु काढात पोरेस्नी त्यास्ना नी धल्लाधल्लीना भी. तठे सदगुरुना आसरम से. नास्तापानी करी गाडी मव्हरे निंघनी. मंग आमी कोनुर टी इस्टेटले गऊत. तठेभी फोटुक काढात सुनबाईनी तिन्ही सासूले बयजबरी तठला पोशाख घाली चहाना मयाम्हा फोटुक काढात. बायकोले तठला डिरेस घालेल दखी मी बायकोना पिरेमम्हा नवाईन पडनू. तिन्हा चेहरा आजभी तसाज टवटवीत वाटना मुयना रुपले चार चांद लागी गयात. मव्हरे आमना परवास सुरु झाया. निलगीरी पर्वतरांगाज म्हाईन गाडी जायी राह्यंती. तठला उच्चा उच्चा झाडे,भरी येयेल ढगे, पक्षीस्ना गोड गोड आवाज आनखी काय काय सांगू ? ते समध दखी डोयास्न पारनं फिटी गय. जसा काही आमी शंकरजीना कैलासम्हाज फिरी राह्यंतूत. दिन मावतले ऊटीले भिडनूत. तठे पह्यलेंगज बुक करेल लाजम्हा गऊत. हातपाय तोंड धूयी ताजातवाना व्हयनूत,चहावर बिस्कीटेजवर ताव मारा. तठे जोगेज रोझ गार्डन से. तठे न्यारा न्यारा रंगना आकारना गुलाबना फुले दखी मन आननम्हा भरी उनं. ती जसी इंद्रनी इंद्रपूरीज दिसे. पोरे तं जसा आननम्हा त्या गार्डनम्हा फुलपाखरेजना मायक उडी राह्यंतात. भरा-या मारी राह्यंतात. तठला तलावना काठवर उभा राही पोरेस्नी फोटो काढात. तलावम्हा धाकुलसी बोटम्हा फेरफटका मारा. तठेंग निंघूज नै आस वाटे मातर पोटम्हा कावया कोकावाले लागी गयथात. लाजवर उनूत रुमम्हाज जेवण मांगाड आनी आंथरुनम्हा घूसनूत. ऊंडायाना दिन म्हनिन आमी गरम कपडा पंघराले काहीज लयी जायेल नव्हतूत. थंडी मारी कुमचाडी राह्यंती ते थंड हवानं उच्चावरल ठिकानं. कसाबसा डोया लागनात.
सव्विस तारीखले सकायम्हा गरम पानीवरी आंगेतोंडे धूयी तयार झाऊत चहा ल्हीधा नी सुरु झायी भटकंती.
गाडीना डायव्हर माहितगार व्हथा पोरगाभी त्या भागम्हा फटफटीवर फिरेल व्हथा. त्या तठला फेमस ठिकाने दखाडी राह्यंतात. डोडाबेट्टा पिकवर लयी गयात तठे उच्चा मनोरा व्हथा. मनोरा वरथाईन त्या परिसरम्हान रुपड बू भारी वाटी राह्यंत ते रुपड डोयाजम्हा भरी ल्हेवो आसं वाटे. मंग पायकराना धबधबा दखाले गऊत. खाले वर चढी दम लागी गयथा. मातर तरोन पोरे उड्या मारतज चढीउतरी राह्यंतात. उटीना लेकभी दखासारखा से. तठेंग Wedlock Downs Shooting point म्हंजे सिनेमावाला जठे शूटींग करतस ते ठिकानं दखाले गऊत. आते दाट ( घनदाट ) झाडीम्हाईन परवास सुरु झाया. गाडी उभी करी ती झाडी खोल द-या दख्यात. डायव्हर सांगे ह्याज जंगलम्हा चंदन तस्कर विरप्पन राज व्हत. तो चंदननी तस्करी करे. भली मोठी त्यान्ही टोयी व्हथी. अमाप पयसा कमाये गोरगरीब आदिवासीस्ले वाटे त्यास्ले सुखदुखम्हा मदद करे. त्यामुये त्याभी त्यान्हावर मय्या करेत. तिन तिन राज्येस्ना पोलीस त्याले पकडाले जायेत तरी तो हाते लागे नै. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यना पोलीस थकी गयथात. तठला झाडे मान उच्ची करी दखूत तं माना दुखाले लागेत.या जंगलना आर्धा भाग तामिळनाडू म्हा से तं आर्धा भाग कर्नाटक म्हा से. तामिळनाडू म्हाना भागले मुदुमलाई म्हनिसन वयखतस तं कर्नाटक म्हाना भागले बंदीपूर म्हनिसन वयखतस. रस्ताधरी हत्ती. सांबर,हरीनं, मोर लांडोर आसा प्राणी दिसनात तं डायव्हर गाडी उभी करी ल्हेये. मंग उनं National Park Tiger Reserve. वाघेस्न राखीव पार्क म्हंजे जंगल. तठे जावावर तठला फारेस्टनी गाडीवर चारपाच किलोमीटर जंगलम्हा फेरफटका मारा. परतेकी साडेतिनसे रुप्या ती गाडीनं भाडं व्हथ. हत्तीस्ना,हरणेस्ना सांबरेस्ना कयप, रानगायीस्ना कयप दिसना का गाडी उभी राहे मातर त्या प्रानी त्यासनीज धूंदम्हा चालेत. मोरभी गच्ची दखाले भेटनात. मातर आमले वाघोबानं दर्सन काही झाये नै. तठेंग मव्हरे निंघनूत आनि रातले म्हैसूरले भिडनूत. इतिहास भूगोलम्हाज म्हैसूर वाचेल दखेल व्हथ.
म्हैसूरले मातर आपला सारखज कडक ऊनं. रातले यक चांगली लाज दखी मुक्काम ठोका. झोपाना पह्यंलेंग पोरे बग्गीवर म्हंजे घोडास्ना टांगावर राजवाडाले फेरफटका मारी उनात. रुमवरज जेवण मांगाड आनि झोपनूत. एसी रुमम्हा चटकन डोया लागी गयात. सकायले उठी ताजतवानं व्हयी म्हैसूर नगरीनं वयभव दखाले निंघनूत.म्हैसूर प्यालेस अम्बा विलास पँलेस म्हनिनभी वयखास. त्या महलन बांधकाम, शिल्पकाम ,मूर्त्या दखी डोया दिपी गयात. तठे मझारम्हाज मंदीरेभी सेत. गार्डन भी से. हौसी लोके ते सौंदर्य दखाथाईन फोटो काढाम्हाज गुंग व्हतात.
दूपारले जेवनं करी म्हैसूर इवानतय कडे निंघनूत. त्याले Mandakalli Airport भी म्हनतस. म्हैसूरथाईन इवानवर चेन्नई
ले निंघनूत. चेन्नई ले खाले नुसत पानिचपानी दिखे. समींदरनं पानी. मंग चेन्नई थाईन पुनाले जानारा इवानवर बसनूत . इवानम्हा बसी भलत आप्रुक वाटे. बायकोना तोंडवाटे यकदम बाहेर पडनी दुवा, ” मन्हा राऊ नी ऐश्वर्या कायम सुखम्हा राहोत ”
यकदावना पुनाले यी भिडनूत. तठे पाच सहा दिन आराम करी धूय्याले उनूत. हायी सहल कधीज इसराऊ नैत भो, पाच इमानतये नी तिन फ्लाईट.
“जसं काही आमी दोन्ही जिवेस्नी हायी जागेपने सपनज दख”